नाशिक : नाशिकमध्ये समोर आलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण राज्यासह देशाला हादरवून सोडले आहे. स्वतःला ‘कॅप्टन’ म्हणवून घेणाऱ्या अशोक खरातने शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे आरोप समोर आल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी उघड होत आहेत. विशेष म्हणजे, राज्यातील अनेक राजकीय नेते, अधिकारी आणि प्रतिष्ठित व्यक्तीही त्याच्याकडे भविष्य जाणून घेण्यासाठी जात असल्याची माहिती समोर येत आहे.
गेल्या काही वर्षांपासून अशोक खरात हा लोकांच्या अडचणी सोडवतो, भविष्य सांगतो आणि यशाचा मार्ग दाखवतो, असा दावा करत होता. 2022 साली तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे जाऊन पूजा केल्यानंतर खरात अचानक चर्चेत आला आणि त्याची प्रसिद्धी राज्यभर पसरली. त्यानंतर राजकारणी, पोलीस अधिकारी, उद्योजक आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक मान्यवरांचा त्याच्याकडे वावर वाढू लागला.
पोलीस तपासात ‘मोडस ऑपरेंडी’ उघड
नाशिक पोलिसांनी बुधवारी रात्री खरातला अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या विशेष तपास पथक त्याची कसून चौकशी करत असून, या तपासात त्याने लोकांना जाळ्यात ओढण्यासाठी वापरलेली पद्धत (मोडस ऑपरेंडी) समोर येत आहे. त्याचबरोबर, राजकीय वर्तुळाशी त्याचे संबंध कसे मजबूत झाले, याचाही तपास सुरू आहे.
मिरगावातील मंदिरातून ‘दरबार’
सिन्नरच्या मिरगाव येथे मंदिर उभारल्यानंतर खरातने आपला ‘दरबार’ सुरू केला. ज्योतिष, अंकशास्त्र आणि धार्मिक विधींच्या नावाखाली तो लोकांच्या अडचणी सोडवण्याचा दावा करत असे. अपत्यप्राप्ती, वैवाहिक समस्या, नोकरीतील अडथळे, राजकीय भविष्य अशा विविध कारणांसाठी लोक त्याच्याकडे धाव घेत असत. विशेषतः पौर्णिमा आणि अमावस्येच्या दिवशी त्याच्या दरबारात मोठी गर्दी होत असे, ज्यामध्ये श्रीमंत आणि प्रभावशाली लोकांचाही मोठा सहभाग असायचा.
पूजा करुन 20 फुटी नागाला बोलवायचा
नाशिक हे धार्मिक विधींसाठी प्रसिद्ध असल्याचा फायदा घेत खरातने ‘सर्पपूजा’चा प्रकार सुरू केला. दरबारात जमलेल्या भाविकांसमोर तो ध्यानस्थ बसून तंत्र-मंत्रांचा जप करीत असे. काही वेळानंतर अचानक 20 फुटांचा नाग प्रकट होत असल्याचा आभास निर्माण केला जात असे. खरातच्या इशाऱ्यावर हा नाग फणा काढून डोलत असल्याचे दृश्य पाहून उपस्थित भाविक घाबरून जात असत. या प्रकारामुळे अनेकांना खरातकडे दैवी शक्ती असल्याचा भास निर्माण होत असे. काही जण भीतीने बेशुद्ध पडल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. प्रत्यक्षात हा सगळा प्रकार पूर्वनियोजित आणि बनावट असल्याचे समोर येत आहे.
महिलांना एकटं बोलावून करायचा शोषण
भक्तांच्या मनात भीती आणि अंधश्रद्धा निर्माण करून त्यांना आपल्या प्रभावाखाली ठेवणे, हीच खरातची मुख्य पद्धत असल्याचे तपासात स्पष्ट होत आहे. एकदा विश्वास बसल्यानंतर तो महिलांना वेगवेगळ्या कारणांनी एकटं बोलावून त्यांचे शोषण करत असल्याचा आरोप आहे. एकूणच, धार्मिक श्रद्धा, भीती आणि अज्ञान यांचा गैरफायदा घेत अशोक खरातने मोठं जाळं उभं केलं होतं. आता या प्रकरणाचा तपास पुढे जात असताना आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.